नांदेड, बातमी24ः आयुर्वेदिक महाविद्यालयात कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोव्हीड केअर सेंटरची नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी पाहणी केली असून वैद्यकीय अधिकार्यांना व लवकरात लवकर रुग्णांसाठी नवीन 60 सुसज्य खाटांची व्यवस्था करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजपूत यांना सूचना केल्या.
सध्या सर्वत्र कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात गर्दी होत आहे, यातून रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत. वैद्यकीय विभागाकडून देखील रुग्णांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आ. बालाजी कल्याणकर यांनी दोन दिवसापूर्वीच शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. पुन्हा बुधवारी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय येथील कोव्हीड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली.
सध्या आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता भासत असल्याने, पुढील काळात वैद्यकीय अधिकार्यांचा भरणा करण्याची मागणी ही यावेळी केली. तसेच चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्यांची देखील कमतरता असल्याचे सांगितले. या बाबत आ. कल्याणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण याच्याकडे तक्रारी मांडणार असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.