तपासण्यांच्या संख्येत मागच्या तीन दिवसांपासून घट

नांदेड

नांदेड, बातमी24ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्यापासून कोरोनाच्या चाचण्यांची संख्या थेट पाचशेने घटविण्यात आली. ही संख्या कशामुळे घटविण्यात आली. याबाबत प्रशासनाकडून कळू शकले नसले,तरी बाधितांचा आकडा रोजची-रोज मोठा दिसू नये, अशी कदाचित त्या मागची प्रशासनाची भूमिका असू शकते.

प्रशासनाकडून रोजच्या रोज पंधराशे ते सोळाशे जणांची चाचणी केली जात असायची.ही संख्या कमी करत प्रशासनाने चाचण्यांची आकडेवारी हजार ते अकराशेवर आणली आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेली साडे तिनशे ते चारशेचा आकडा घटून थेट अडीचशेवर आला आहे. याचा अर्थ जिल्ह्यातील रुग्णांची संख्या घटली, असे म्हणता येणार नसून तपासणी कमी केल्यामुळे आकडा घटला असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते.

शुक्रवार दि. 18 सप्टेंबर रोजी 1 हजार 156 जणांची तपासणी करण्यात आली. 822 अहवाल निगेटीव्ह तर 283 जणांचा अहवाल कोरोना संक्रमित आला आहे.एकंदरीत आतापर्यंत जिल्ह्यात बाधितांची संख्या 12 हजार 984 एवढी झाली आहे.तसेच 277 जणांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे 8 हजार 757 जण बरे झाले आहेत. सध्या 3 हजार 817 जणांवर उपचार सुरु आहेत. तर चिंताजनक रुग्णसंख्या 34 झाली आहे.
——
पाच जणांचा मृत्यू

लोहा येथील पवार गल्ली येथील 53 वर्षीय पुरुषाचा दि. 7 रोजी मृत्यू झाला. कंधार येथील 63 वर्षीय पुरुषाचा दि. 9 रोजी मृत्यू, भोकर येथील 64 वर्षीय पुरुषाचा दि. 15, बिलोली येथील गांधीनगर येथील 70 पुरुषाचा दि. 17 रोजी, तसेच किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील 38 वर्षीय पुरुषाचा दि. 17 रोजी मृत्यू झाला. त्यामुळे 343 झाली आहे.