जि.प.सीईओ म्हणून वर्षा ठाकुर यांची कसोटी लागणार

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदे साडे सहा महिन्यानंतर वर्षा ठाकुर यांच्या रुपाने पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिळालेली पदोन्नती ही काम करण्याची संधी असली, तरी जिल्हा परिषदेच्या रुतलेले विकासाचे चाक गतिमान करण्यासोबतच नव-नव्या योजना व उपक्रमांना चालना देऊन ग्रामीण भागाशी नाळ जोडणे ही एकाप्रकारे कसोटी असणार आहे.

मराठवाडयातील क्षेत्रफ ळ व भौगोलिक दृष्टया नांदेड जिल्हा सर्वात मोठ आहे. 63 जिल्हा परिषद सदस्य, सोळा पंचायत समिती व साडे तेराशेहून अधिक ग्रामपंचायती अशी मोठी रचना नांदेड जिल्हा परिषदेची आहे. जिल्ह्याचा दौरा करायचे म्हटले, तरी किमान दोन ते तीन दिवस पंचायत समिती फि रायलाच लागतात. त्यामुळे नांदेड जिल्हापरिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणे म्हणजे, त्याग, समर्पण व कष्ट करणार्‍याची घट मानसिकता हे महत्वाचे दुवे ठरू शकतात.

वर्षा ठाकुर यांच्या नावाचा महसूली प्रशासनात गवगवा आहे. प्रचार-प्रसिद्धी हे त्यांचे आवडते विषय आहेत. बहुतांशी नौकरी ही औरंगाबादमध्ये तिही साईड पोस्ट म्हणून झालेली आहे. महसूली अधिकार्‍यांचा जिल्हा परिषद अधिकार्‍यांप्रमाणे ग्रामीण भागाशी किंवा थेअ काम करण्याचा फ ारसा संबंध येत नाही. महसूली कामाचा व कार्याचा आवाकाही मर्यादीत असतो. इकडे ग्रामीण भागाचा कारभार चालविणारी जिल्हा परिषद ही अनेक विभाग व शेकडो योजना व उपक्रमांनी भरलेली असते.

पंधरा ते सोळ हजार कर्मचारी संख्या असलेल्या जिल्हा परिषदेची सीईओशीप म्हणजे, जिल्हाधिकार्‍यांपेक्षा ही मोठ पद आहे. तीस ते पस्तीस लाख जनतेचे पालक असता, या मागास व आदिवासी भागातील लोकांच्या कल्याणाच्या योजना शासनाच्या असल्या, तरी नवनवे उपक्रम राबवून विद्यार्थी असो किंवा महिला सबलीकरणाच्या दृष्टीने काम करण्याची मोठी संधी वर्षा ठाकुर यांना असणार आहे. ही संधी कामाच्या माध्यमातून त्या कशा प्रकारे जवळ करून नांदेड जिल्हा परिषदेची ओळख राज्यभरात निर्माण करू शकतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
——
काही अधिकार्‍यांच्या आदर्श घ्यावा लागणार
नांदेड जिल्ह्यात परिषदेत यापूर्वी काही चांगले अधिकारी होऊन गेले, त्यांनी चांगली कामे केली. यामध्ये अभिमन्यू काळे, अशोक शिनगारे यांचा उल्लेख करावा लागेल, अशा अधिकार्‍यांनी ज्या प्रकारे कामे केली, त्याप्रमाणे वर्षा ठाकुर यांनी चांगले उपक्रम राबविल्यास ग्रामीण भागाला न्याय मिळू शकेल, अन्यथा येरे माझ्या मागल्याप्रमाणे अवस्था होऊ जाऊ शकते.