कृषीमंत्री शेत शिवारात; नुकसानीची केली पाहणी

नांदेड

नांदेड बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्याचा दौरा केला.

या वेळी बोलताना म्हणाले, की
मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. मी प्रत्यक्ष शेतकर्‍यांशीही संवाद साधतो आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

या वेळी त्यांनी नांदेड तालुक्यातील कासारखेडा या गावातील शिवारांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पूरभाजी तुकाराम शिंदे या शेतकर्‍याने कृषि मंत्र्यांचे लक्ष वेधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यांनी व आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी लावलेले सोयाबिन हातचे गेले आहे. शिंदे व इतर शेतकर्‍यांना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. शासनस्तरावरुन याबाबत आम्ही योग्य तो विचार करत असून केंद्र सरकारला लवकरच याबाबत आहे ती वस्तुस्थिती मांडून शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले