नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यासाठी आणखी एक विधान परिषद आमदार मिळणार हे जवळपास निश्चित झाले,असून या भावी आमदारास वंचित-उपेक्षित घटकाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाने मिळणार आहे.
राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी चार जणांच्या नावांची यादी अंतिम केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून मागच्या वेळी लोकसभा निवडणूक वंचीत बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढलेले मराठी विषयाचे प्राध्यापक यशपाल भिंगे यांचे नाव राष्ट्रवादीकडून जवळपास निश्चित मानले जात आहे.
बारा आमदारांची यादी राज्यपाल कधी जाहीर करतात याकडे आता लक्ष लागले आहे. मात्र या बारा जणांच्या यादीत प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव खात्रीशीर मानले जात आहे.ते आमदार झाल्यास विधान परिषदेच्या माध्यमातून नांदेडला तिसरा आमदार मिळू शकणार आहे.यापूर्वी काँग्रेसकडून अमरनाथ राजूरकर,भाजपकडून राम पाटील रातोळीकर हे आमदार आहेत. तर विधानसभेचे नऊ सदस्य आहेत. असे अकरा आमदार असून कदाचित प्रा.यशपाल भिंगे हे विधान परिषदेवर गेल्यास जिल्ह्याला बारावे आणि विधान परिषदेतील जिल्ह्यातील तिसरे विद्यमान आमदार ठरू शकतील.