निवडणूक चव्हाण-बोराळकर यांची मात्र चव्हाण आणि चिखलीकर यांची कसोटी

राजकारण

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:-मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या दि.1 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण व भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात  बोलायचे झाल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन परस्परविरोधी नेत्यांची कसोटी लागणार आहे.

तीन दिवसावर या निवडणुकीचे मतदान राहिले,असून मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.बोराळकर यांच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांची तर सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची सभा झाली.राज्याच्या राजकारणातील दिगग्ज नेते असलेले अजित पवार,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे सभा घेऊन रंगत आली आहे.

तिसऱ्यांदा विजय मिळविता यावा,यासाठी सतीश चव्हाण हे जीवाचे रान करून मराठवाड्यात प्रचार दौरे सुरू केले,नांदेड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीची ताकद फारशी नसल्याने एकांकि पणा दिसून आला.काँग्रेस या निवडणुकीत सक्रिय नसल्याचे दिसून आले आहे,अपवाद अजित पवार यांच्यासोबत झालेल्या सभेचा वगळता काँग्रेसला उमेदवाराच्या बाजूने प्रभाव पाडता आलेला नाही.

त्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात भाजपने प्रत्येक तालुका पिंजून काढला आहे. पदवीधर मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.भाजपचे राज्यातील नेतेमंडळी सुद्धा जिल्ह्यात येऊन जात आहे.मागच्या दोन दिवसात राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे दौरे लक्षवेधी ठरले आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्ह्यापुरते का होईना,या निवडणुकीला महत्व आणले,असून यात भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बोराळकर यांच्यासाठी प्रचार यंत्रणा भक्कमपणे राबविल्याचे बघायला मिळत आहे. त्या तुलनेत काँग्रेसची यंत्रणा थंड बासनात असल्याचे दिसून येत आहे.तसे पाहता एकमेकांचे विरोधक असलेल्या चव्हाण व चिखलीकर या दोघांसाठी ही निवडणूक महत्वाची असून या दोन्ही नेत्याची कसोटी असणार आहे.
राज्यातील सत्तांतर व कोरोनानंतर होणारी पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीला अन्यसाधारण महत्व नक्कीच आले आहे,त्यामुळे चिखलीकर व अशोक चव्हाण यांची सुद्धा ही निवडणूक पुढील काळात होणाऱ्या नगरपालिका,महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे.