एक लाख पाच हजार ग्राहकांची ऑनलाईनला पसंती

महाराष्ट्र

 

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता विनंती, व्हॉटसॲप व प्रत्यक्ष भेट घेवून साधलेल्या सुसंवादातून नांदेड परिमंडळातील कृषीपंप ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील दोन लाख 69 हजार 517 वीजग्राहकांनी माहे डिसेंबर मधे 48 कोटी 53 लाख रूपयांचा वीज बील भरणा केला आहे. या मधे एक लाख पाच हजार 492 वीजग्राहकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून घर बसल्या 17 कोटी 91 लाख रूपयांचे वील बील भरले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणकडुन कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत नाही. वीज ग्राहकांनी वीजबिले भरण्यासाठी स्वत:हुन पुढे यावे यासाठी विनंती, सुचना, पत्रव्यवहार, व्हॉटसॲप, एक गाव एक दिवस उपक्रम, एसएमएस व प्रत्यक्ष भेट घेवून सुसंवाद साधण्याचा उपक्रम महावितरण गेल्या सहा महिन्यापासून सातत्याने राबवत आहे. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी परिमंडळातील सर्व विभाग प्रमुख तसेच उपविभागीय अधिकारी, कर्मचारी यांच्या व्हिडीओ कॉन्फरर्सिंगच्या माध्यमातुन कोवीड-19 च्या सर्व निर्देशांचे पालन करत विजग्राहकांना कसल्याही प्रकारचा त्रास न देता सुसंवाद साधत थकबाकी वसुलीचे उध्दिष्ट साध्य् करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वीज ग्राहकांनीही सकारात्मकतेने या मोहिमेस उत्तम प्रतिसाद देत वीज देयकांचा भरणा केला आहे.

डिसेंबर मधे नांदेड परिमंडळातील 1 लाख 5 हजार 492 वीज ग्राहकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून 17 कोटी 91 लाखांचा भरणा केला आहे. तर 1 लाख 64 हजार 25 वीजग्राहकांनी प्रत्यक्ष वीज बील भरणा केंद्रावर जावून 30 कोटी 62 लाख रूपयांचा भरणा केला आहे. नांदेड परिमंडळा अंतर्गत येणाऱ्या नांदेड मंडळातील 1 लाख 77 हजार 715 वीजग्राहकांनी 31 कोटी 5 लाख रूपये तर परभणी मंडळातील 50 हजार 193 वीजग्राहकांनी 10 कोटी 85 लाख रूपये भरणा केला आहे. त्याचबरोबर हिंगोली मंडळातील 41 हजार 609 वीजग्राहकांनी 6 कोटी 63 लाख रूपयांचा वीज बील भरणा केला.