ऍड.आंबेडकरांनी प्रयोग करण्यापेक्षा ऐक्याचे नेतृत्व करावे:-आठवले

देश

नांदेड,बातमी24:-निवडणूका जिंकण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षांनी एकत्र येवून तडजोडीने राजकारण केले तरच निवडणुकांमध्ये आपली माणसे आमदार, खासदार बनू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.
लोहा तालुक्यातील शिवणी जामगा ता.लोहा येथे अनुसूचित जातीच्या युवकावर झालेल्या हल्ल्यानंतर रामदास आठवले त्या कुटुंबाच्या भेटीसाठी नांदेड जिल्ह्यात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सिध्दार्थ भालेराव, विजय सोनवणे उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना आठवले म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने एक चांगला संदेश बाळासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भरपूर मते घेतली, पण त्यांचा एकही आमदार, खासदार निवडून येऊ शकला नाही. यासाठी रिपब्लिकन पक्षांनी एकत्रितपणे, तडजोड करुन राजकारणात उतरायला हवे जेणेकरुन आपल्या निवडणूका जिंकता येतील. रिपब्लिकन अर्थात प्रजासत्ताक हा शब्द व्यापक असून, या नावासोबत बाळासाहेब आंबेडकरांनी या पक्षाचे अध्यक्ष होवून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन मी अनेकदा केले आहे,पण बाळासाहेब आंबेडकर त्यास प्रतिसाद देत नाही, असे रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन या शब्दाचा उल्लेख करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दांना विशद करुन रिपब्लिकन हा शब्द कसा व्यापक आहे हे रामदास आठवले यांनी सांगितले. एकट्या शक्तीवर आपल्याला निवडणूका जिंकणे शक्य नाही आणि त्यासाठीच सर्व रिपब्लिकन विचारांच्या पक्षांनी एकत्रितपणे आणि इतर राजकीय पक्षांशी तडजोड करुन निवडणूका लढवाव्यात, असे सांगितले.
शिवणी जामगा येथे गणेश ऐडके या युवकावर मोटारसायकल आणि सायकलच्या अपघातातून झालेल्या वादात जिवघेणा हल्ला झाला.त्या कुटुंबाला भेटल्यानंतर रामदास आठवले यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिकीमधील नऊ आरोपींपैकी आठ आरोपींना जेरबंद केले आहे. गणेश ऐडकेवर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. गणेश ऐडकेबद्दल सांगताना रामदास आठवले म्हणाले, अनेक मुलांना कमी पैश्यांमध्ये त्यांच्या शाळा, कॉलेज, शिकवणी वर्गांना नेवून गणेश ऐडके हे उत्तम करत होते. त्यावर झालेला हल्ला दुर्देवी आहे. आपसात वैरभाव मिटायचे असतील तर आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत, जेणेकरुन वैरभाव मिटेल आणि वाद होणार नाहीत, असे रामदास आठवले यांना वाटते. देशात दरवर्षी एक लाख पेक्षा जास्त आंतरजातीय विवाह होतात ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि सवर्ण अशा विवाहांना शासन दोन लाखाची आर्थिक मदत देते हे सांगितले.
देशात कोरोनाची होणारी वाढ स्पष्ट करताना रामदास आठवले यांनी सांगितले की, देशातील कोरोनाबाधीतांच्या तुलनेत 50 टक्के कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. हा भाग अत्यंत गंभीर असून, त्यावर जनतेने दक्ष रहावे, असे सांगितले.
शेतकरी आंदोलन आणि शेतकरी नेत्यांसोबत संवाद सुरुच असून, कायद्यातील योग्य बदलांना मंजुरी देण्यासाठी शासनाची तयारी आहे. कायदा कोणत्याही परिस्थितीत बदलण्याची अपेक्षा चुकीची असून, तसे झाले तर प्रत्येकजण कायदा बदलाची मागणी उचलून धरेल, तेंव्हा आम्ही सुध्दा आंदोलने केली होती, त्यात आम्हाला सुध्दा तडजोड करावी लागली होती, असे शेतकरी नेत्यांनी कायद्याच्या संदर्भाने तडजोड करुन कायद्यात बदल सुचवावेत आणि शेतकरी आंदोलन संपवावे, असे सांगितले. शेतकरी आंदोलनात 90 टक्के आंदोलक हे पंजाब राज्यातील आहेत, असेही रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींना शासनाने संरक्षण द्यावे अशी विनंती मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करत असल्याचे रामदास आठवले म्हणाले. शिवसैनिक आणि भिमसैनिक एकत्र रहावेत हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उध्दव ठाकरेंनी पुढाकार घेवून काम करण्याची गरज असल्याचे रामदास आठवले म्हणाले.