सोयाबीन फसवणूक प्रकरणी कारवाई होणार- पालकमंत्री चव्हाण

ताज्या बातम्या

नांदेड,बातमी24;-
पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाभरातून समोर येत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु, अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी यासंदर्भात बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारीसुद्धा केल्या आहेत. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती मागवली आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी कारणीभूत ठरलेल्या बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अशा परिस्थितीत सदोष बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे चव्हाण यांनी बजावले आहे.
यासंदर्भात शासन कारवाई करेल. मात्र, दरम्यान शेतकऱ्यांनी वेळ न दवडता शेतातील ओलावा पाहून पर्यायी पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन देखील चव्हाण यांनी केले.