खासदार चिखलीकरांचे पक्षातूनच काउंटडाऊन;सुप्त वादात पक्षातील अनेकांचे हात

राजकारण

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभूत करून भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्ववादी ठरले. मात्र राज्यातून भाजपची सत्ता जाताच चिखलीकर यांचे एकहाती वर्चस्व पक्षातूनच संपविण्याचा प्रयत्न म्हणजे, चिखलीकर यांचे त्यांच्याच पक्षातून राजकीय काउंटडाऊन करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा अंतर्गत बंडाळी समोर आली. भाजपचे विधान परिषद आमदार राम पाटील रातोळीकर यांना ऐनवेळी बँक निवडणुकीतून अर्ज मागे घ्यावा लागला. त्यामुळे चिडलेल्या रातोळीकर यांनी जिल्हा पातळीवर चिखलीकर यांना मदत न करता, समर्थ विकास पॅनला मदत करण्याचे आवाहन केले. या संदर्भातील संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.यावरून चिखलीकर समर्थकांकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून रातोळीकर यांचा रोज समाचार घेतला जात आहे. परंतु भाजपमध्ये चिखलीकर विरोधी गट अधिक सक्रिया होत असल्याचेही या निमित्ताने समोर आले.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणे अशक्य होते. तसे पाहता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने दीड लाखांपेक्षा अधिक मते मिळविल्याने चिखलीकर यांचा विजय सहज शक्य झाला अन्यथा भाजपला विजयाचे सोपान गाठणे तितके शक्य झाले नसते. असो, विजय हा विजयच असतो, कोणामुळे काय घडले यास नंतर फ ारसे महत्व नसते.

लोकसभा निवडणुकीमधील विजयानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. अगदी तिकिट वाटपापासून ते उमेदवारी ठरविण्याचे सर्व अधिकार पक्षाने जिल्ह्यापुरते का होईना चिखलीकर यांच्याकडे दिले. अनेकांना पक्षात आणण्यात चिखलीकर हे यशस्वी झाले. मात्र चिखलीकर यांचे वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सुरुवातीला केला. प्रसिद्धीपत्रक काढून चिखलीकर यांच्यावर आरोप केले.मात्र त्यांच्या पत्रकाची पक्षपातळीवर दखल घेतली गेली नाही. चिखलीकर यांना होणारा विरोध आताच झाला असे नव्हे. त्यास जुने विरुद्ध नवे अशी सुद्धा एक झालर आहे.

लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांचा केलेला पराभव हा काँग्रेसच्या जिव्हारी लागलेला मोठा घाव असून त्या घावाच्या जखमा अजून भरून निघालेल्या नाहीत. काँग्रेसकडून चिखलीकर यांना जितके डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तितकाच प्रयत्न काँग्रेसच्या इशार्‍यावर भाजपमधीलच मंडळीच करत आहे. त्यामुळे यात काँग्रेसचे अधिक फ ावत आहे. शिस्त सांगणारा भाजप पक्ष जिल्हयाच्या राजकारणात बेशिस्त झाल्याचे अशा प्रकारामुळे वेळोवेळी समोर येत आहे. रातोळीकरांनी केलेला विरोध चिखलीकरांचे राजकीय काउंटडाऊन करण्याचा प्रयत्न मानला जात असला, तरी चिखलीकर हे अशा विरोधाला कसे तोंड देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.