उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न : मुख्य अभियंता पडळकर

नांदेड

 

नांदेड,बातमी24: नांदेड व कृष्णूर औदृयोगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत अखंडीत वीज सेवा देण्यास महावितरण बांधील असल्याचे अभिवचन देत नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी वीजबिलांचा भरणाही वेळेच्या आत करावा असे आवाहनही उद्योजकांना केले.

 

लघू उद्योग भरती या प्रमूख संघटनेसह इतर औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी सोबत नुकताच मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी प्रत्यक्ष सुसंवाद साधला. यावेळी उपस्थित उद्योजकांनी वीजपुरवठया संबंधी समस्या मांडत महावितरणने देखभाल दुरूस्तीचे वेळापत्रक निश्चीत करून देखभाल करावी जेणेकरून वेळापत्रकानुसार आम्हाला काम करता येईल. त्याचबरोबर रोहीत्रा मधील ऑईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे उद्योजकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यावर आळा घालण्यासाठी महावितरणने पोलीस कारवाई करावी. नांदेड औद्योगिक क्षेत्रासाठी प्रत्येक रोहित्रावर ऐबी स्वीच बसवण्यात यावे जेणेकरून देखभालीसाठी संपूर्ण वीजवाहिनी बंद ठेवण्याची गरज पडणार नाही. तसेच कृष्णूर औद्योगिक क्षेत्रासाठी स्थायी सहायक अभियंता व रात्र पाळीसाठी लाईन मन नियुक्त करावे. बरबडा उपकेंद्रावरून वीजपुरवठा देण्याऐवजी 220 केव्ही लाईनवरून द्यावा अशा प्रमूख मागण्या उद्योजकांनी मुख्य अभियंता यांच्या समोर मांडल्या.

 

औद्योगिक ग्राहकांना नेहमीच उत्कृष्ट सेवा देण्यावर महावितरणचा भर असून आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत त्यात आणखी सुधारणा करण्यात येतील. तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामाचे योग्य ते नियोजन करून या कामासाठी औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन देत महावितरणची आर्थिक परिस्थिती पाहता उद्यांजकांनीही वेळेच्या आत थकबाकी व चालू देयकांचा भरणा करावा असे आवाहनही मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी केले.