अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात पेट्रोल,डिझेल गॅस भाववाढीच्या विरोधात काँग्रेसचा मोर्चा

राजकारण

 

नांदेड,बातमी24:-अच्छे दिनचे स्वप्न दाखवीत सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे भाव भरमसाठ वाढविले आहेत. पेट्रोल ने शंभरी पार करून दीडशे कडे वाटचाल सुरू केले आहे तर डिझेल शंभरी गाठत आहे .घरगुती गॅसच्या किमती अस्मानाला पोहोचल्या आहेत. यामुळे सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. देशावर लादलेल्या या महागाईचा एक दिवस विस्फोट होऊन यामध्ये मोदी सरकार भस्म होईल, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला.

शहरातील जूना मोंढा ते महात्मा गांधी पुतळा या दरम्यान काँग्रेसच्या वतीने आज अतिविराट बैलगाडी व सायकल मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व करत कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की देशामध्ये सामान्य माणसांच्या विरोधात निर्णय घेतल्या जात आहेत. संसदेमध्ये शेतकरी विरोधी कायदे पारित केले. या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे .त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणारे कायदे आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात संमत करून घेणार आहे. केंद्र सरकार यांनी 102 व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाची मर्यादा 50 टक्‍क्‍यांपर्यंत सीमित केली आहे. मराठा , धनगर मुस्लिम, ओबीसी यांना जर न्याय द्यायचा असेल तर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून या समाजाला आरक्षण दिले पाहिजे .जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी हे अधिकार राज्य सरकारांना प्रदान करावेत. महाराष्ट्रात आम्ही त्यानंतर मराठा समाजाला समाजाला आरक्षण देऊन दाखवू. माझे जिल्ह्यातील सहकारी माजी खासदार सुभाष वानखेडे असो किंवा मोहन मोहन हंबर्डे असो डी पी सावंत असो अमरनाथ राजूरकर असो यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका वाठविली असल्याचे चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी विधानपरिषद प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर ,माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी खा.सुभाष वानखेडे, आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी त्यांच्या भाषणातून केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात प्रहार केला.

या मोर्चामध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. मोहिणीताई येवणकर, उपमहापौर मसुद खान,स्थाई समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी, विनोद कांचनगिरे , युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार ,सत्यजित भोसले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष, मनपाचे अनेक नगरसेवक, जि.प .सदस्य, जिल्ह्यातील विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष ,उपाध्यक्ष, नगरसेवक ,काँग्रेस पक्षाच्या विविध फ्रंटचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.