नांदेड,बातमी24:-या वर्षी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली आहे. वेगवेगळ्या सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी रब्बी पिके घेण्याच्या तयारीत असताना जुनी वीज बील वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. ही बाब शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारे असून थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता सवलतीच्या दरात त्यांच्याकडील थकबाकी वसूल करावी अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या जिल्हयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाचे वीज बील भरले नाही त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरु आहे. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग करुन रब्बी पिकांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो. परंतु अशावेळी केवळ थकबाकीचे कारण देऊन त्यांचे वीज कनेक्शन तोडल्या जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी रब्बीचे पीक घेऊ शकणार नाही.
यावर उपाय म्हणून आज जी प्रचलित वीज आकारणी तीन एचपीसाठी 5 हजार, 5 एचपीसाठी 7 हजार 500 तर 7.5 एचपीसाठी 10 हजार अशी आहे. रब्बी पिकांचे उत्पन्न लक्षात घेतले तरी ही थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांना भरणे शक्य नाही.त्यासाठी सवलतीच्या दरातील प्रति एचपी 700 रुपये प्रमाणे बिलाची आकारणी करुन शेतकऱ्यांचे तोडलेले कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावे अशी आग्रही मागणी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे केली आहे.