शिक्षक-पालकांचे लसीकरण युद्धपातळीवर करून घ्यावे:-सभापती संजय बेळगे

नांदेड

नांदेड,बातमी24:-सर्व शिक्षकांच्या लसीकरणासह विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण करून घेण्यात सर्व गावपातळीवरील शिक्षकांनी भर द्यावा, जिल्हा परिषदेच्या भाडेतत्त्वावरील भाड्यांचा बोजा कमी करून भाडेतत्त्वावरील शाळांना यापुढे भाडे देणे शक्‍य होणार नाही, त्यामुळे त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज दिल्या.

शिक्षण समितीची मासिक बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .बैठकीस ज्येष्ठ सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, साहेबराव धनगे ,बबन बारसे ,जोत्स्ना नरवाडे, अनुराधा पाटील ,संध्याताई धोंडगे, निमंत्रित सदस्य संतोष देवराये, बसवराज पाटील यांनी बैठकीतील चर्चेत सक्रीय सहभाग घेतला.
बैठकीचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी केले .मागील इतिवृत्ताचे वाचन करून सभेसमोर विषय त्यांनी मांडले .शाळा खोली बांधकाम, शाळा खोली दुरुस्ती या विषयावर चर्चा झाली. अत्यावश्यक ठिकाणी शाळा खोलीचे बांधकाम आणि शाळा दुरुस्त्या, ज्या ठिकाणी बांधकामासाठी जागांची उपलब्धता नाही त्याऐवजी जिथे बांधकामाची उपलब्धता आहे आणि शाळेची अत्यंत गरज आहे अशा ठिकाणी बदल करण्याबाबत विचार व्हावा या तांत्रिक बाबी समजून घ्याव्यात. त्याप्रमाणे नियोजन करण्याचे निर्देश दिले.

बैठकीस शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर उपशिक्षणाधिकारी डी.एस. मठपती, बंडू आमदूरकर, अधीक्षक बळीराम येरपूलवार ,लेखाधिकारी योगेश परळीकर ,सर्व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.
चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्याचे काम शीघ्र गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या .साहेबराव धनगे यांनी खासगी क्‍लासेसचा प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थी शाळा महाविद्यालयात न जाता केवळ क्लास वरच अवलंबून आहेत त्यांचा शारीरिक मानसिक विकास होण्यासाठी महाविद्यालयामध्ये खुल्या वातावरणात राहणे आवश्यक आहे. तसेच क्लासच्या वेळा या सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत असाव्यात अशा बाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून यावर कार्यवाही करण्याचे आवाहन बैठकीत त्यांनी केले.
प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या अभिनंदनाचा ठराव बसवराज पाटील यांनी मांडला सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.