नांदेड, बातमी24ः- नांदेड दक्षीणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाबसमोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील चार जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कोरोनाच्या महामारीत लोकांच्या मदतीसाठी जीवाची पर्वा न करता आमदार हंबर्डे यांनी सेवा केली. यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली.
आमदार हंबर्डे यांचा स्वॅब शुक्रवारी रात्री पॉझिटीव्ह आला होता. मात्र मागच्या तीन ते चार दिवसांपासून त्यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले होते.अहवाल आल्यानंतर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. शनिवारी रात्री त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. यात पत्नी, दोन मुलांचा समावेश होता.
शिवाजी नगर भागातील एक खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटलमध्ये पुढील उपचार घेण्यासाठी ते रुग्णवाहिकेने रविवार दि. 28 जून रोजी रवाना झाले. त्यांच्यासोबत पत्नी व मुलगा व मुलगी हे सुद्धा रवाना झाले. यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. चव्हाण यांनी मुंबई येथे स्वतःवर उपचार घेतले होते.
——
सहा जणांवर पंजाब भवन येथे उपचार
आमदार मोहन हंबर्डे यांच्या कुटुंबातील सर्व मिळून दहा जणांना कोरोनाची लागण झाली. यातील स्वतः मोहन हंबर्डे व त्यांचे कुटुंब औरंगाबाद येथे उपचारासाठी गेले तर सहा जणांवर पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत.