बोगस बियाणे प्रकरणी बडया कंपनीवर गुन्हा नोंद

नांदेड

नांदेड, बातमी24ः– बोगस सोयाबीन विक्री केल्यामुळे शेकडो हेक्टरवर उगवून होऊ न शकल्याने करोडो रुपयांचे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले. या प्रकरणी इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यंदा मौसमी पावसाला सगळीकडे दमदार सुरुवात झाली. पाऊस चांगला झाल्याने शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात खरिपाची पेरणी केली. मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी करून लागवड केली. अशा अनेक शेतकर्‍यांचे बियाण उगवले नाही. अशा शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट उभा टाकले.

बोगस बियाणे बाजारात आणून विक्री करणारे व्यापारी व संबंधित कंपनीवर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्षांकडून होऊ लागली होती. यातून प्रशासनावर मोठा दबाव वाढत गेला. मागच्या आठवडयात जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

या प्रकरणाची दखल घेत कृषी सहनियंत्रण समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तक्रारी प्राप्त कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार रविवारी सायंकाळनंतर वजिराबाद पोलिस ठाण्यात इंदौर येथील इगल सीड अ‍ॅण्ड बायोटेक लिमिटेड कंपनीवर गुन्हा करण्यात आला आहे. एखाद्या कंपनीवर बोगस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची या वर्षांमधील पहिलीच कारवाई आहे.