संविधान जनजागृती अभियान चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत याच्या हस्ते उदघाटन

नांदेड

नांदेड,बातमी 24:- भारतीय स्वातंत्र्य व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने संविधान जनजागृती अभियान सुरु करण्यात आले, असून या अभियान चित्ररथ वाहनास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून हे अभियान अंमलात आले, असून समाज कल्याण विभागाच्या 20 टक्के उपकर योजनेतून संविधान जनजागृती अभियान राबविले जात आहे. यातून संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने हे अभियानाची सुरवात जिल्हा परिषदकडून केली आहे.

या अभियानाचे उदघाटन शनिवार दि.26 नोव्हेंबर रोजी अर्थात संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी आयटीआय परीसरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले येथील पूर्णाकृती पुतळा येऊन चित्रवाहनास हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीस सुरुवात करण्यात आली. या अभियानास अभिजित राऊत व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी शुभेच्छा दिल्या. चित्रवाहनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 275 गावांमध्ये जाऊन संविधानाचा प्रचार व प्रसार केला जाणार असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सांगितले.