तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हाच सामाजिक न्याय, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा :- सचिव भांगे

महाराष्ट्र

मुंबई,बातमी24:- राज्यातील तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट असून त्यासाठी लोकाभिमुख प्रशासन राबवून योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यात “सामाजिक न्याय पर्व” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज दि १३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री.भांगे यांनी राज्यातील समाज कल्याण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला त्याप्रसंगी बोलत होते.
शासन, प्रशासनात काम करतांना आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून व भुमिकेत कार्य करावे, यातून निश्चित आपल्या हातून चांगलेच कार्य घडेल, चांगलं कार्य केल्यामुळे कोणाची भीती बाळगण्याचे काम नाही. लोकउपयोगी निर्णय घेताना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रभावीपणे निर्णय घ्यावेत असेही भांगे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सुचित केले.
समाजाप्रती चांगलं कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर आहे.
येणाऱ्या काळात “खात्याची ओळख”, “रयतेचा दरबार” यासारखे अभिनव उपक्रम राज्यातील जनतेसाठी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी श्री भांगे यांनी सांगितले. तसेच विभागात अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे लक्षात घेता लवकरात लवकर भरती प्रक्रिया होणेसाठी विभागाचा आकृतीबंधास शासन मान्यता घेणेबाबातचे निर्देश त्यांनी समाज कल्याण आयुक्त यांना यावेळी दिलेत.
यावेळी राज्याचे समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सामाजिक न्याय पर्वा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुण्याचे श्री सुनिल वारे, सहसचिव दिनेश डिंगळे, लीडकॉम चे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत विविध महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, आयुक्तलयातील सर्व उपायुक्त, सर्व प्रादेशिक उपायुक्त उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त , सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद उपस्थित होते. राज्यात राबविण्यात असलेल्या कार्यक्रमांचा लेखाजोखा यावे राज्यातील क्षेत्रिय अधिकारी यांनी सादर केला.