बोंढार येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणी  मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना खरमरीत पत्र

महाराष्ट्र
  • नांदेड,बातमी24:-
    एकीकडे महाराष्ट्र राज्य शिवराज्यभिषेक साजरा करत असताना सर्व जाती धर्माना समान वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या राज्यात नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव निर्घृण हत्या प्रकरण काळीज पिळवटून टाकणारे आहे.मुख्यमंत्री महोदय या राज्यात दलित वंचित समाज सुरक्षित आहे काय हा खडा सवाल आज मी आपणास विचारीत आहे. केवळ दलित आहे म्हणून आणि गावात भीम जयंती साजरी केली म्हणून ज्या पद्धतीने खंजर भोसकून त्याचा निर्घृण खून करण्यात आला, त्याच्या भावाला आणि आईला मारण्याचा प्रयत्न झाला ही घटना या राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध नोंदवितो. पुरोगामी महाराष्ट्र म्हणवून घेणाऱ्या या राज्यात हे चाललेय तरी काय ?? छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या महाराष्ट्रात आज दलित सुरक्षित का नाहीत ??असा सवाल करत मयत अक्षय भालेराव कुटूंबियास संरक्षण आणि मदत देण्याची मागणी काँग्रेस जेष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केली.

दिलेल्या पत्रात म्हटले, की महोदय, अट्रोसिटी चा कायदा कठोर आहे मात्र अट्रोसिटी ऍक्ट ची प्रभावी व निष्पक्ष अंमलबजावणी होत नाही. अजूनही नियम १६ अन्वये मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत झाली नाही, बैठका नाहीत. राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोग कार्यरत नाही. यापूर्वी अट्रोसिटीच्या घटनेत हत्या, खून, मृत्यू झाला, अशा जवळपास ६३० पीडित कुटुंबाच्या अवलंबितांना अजूनही नोकरी मिळाली नाही. एकीकडे कंत्राटी पद्धतीवर outsourcing ने भरती होत असताना अट्रोसिटी पीडित मात्र दुर्लक्षित आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. वेळेवर आर्थिक मदत मिळत नाही. योग्य तपास होत नाही आणि मुदतीत निर्णय होत नाही. त्यामुळे कायद्यातील तरतुदी प्रामाणिकपणे व प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे राऊत यांनी अपेक्षा व्यक्त केली.

करिता आपण अक्षय भालेराव खून प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबास भेट द्यावी आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. अजुनपावेतो घटना स्थळी मा. मुख्यमंत्री अथवा मा. उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांनी पिडीत कुटुंब व गांवकरी यांना भेट दिली नाही जे अपेक्षीत आहे. सदर प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे असून या अनुषंगाने मी माझ्या काही मागण्या आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो,असा उल्लेख डॉ.राऊत यांनी पत्रात केला,त्यानुसार मागण्या पुढील प्रमाणे आहे.

१) या प्रकरणाचा निष्पक्ष तपास SIT लावून त्यांचे मार्फत तातडीने करण्यात यावा. २) अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने ५० लाखाची अर्थिक मदत देण्यात यावी.
(३) अक्षय भालेरावचा जखमी भाऊ आकाश भालेराव यास शासकीय नोकरी देण्यात यावी. (४) अक्षय भालेराव निर्घुन हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.
५) या प्रकरणात सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी. (६) अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे.
(७) बोंढार गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी पोलीस चौकीची स्थापना करावी.
महोदय घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण तत्काळ कार्यवाही करावी आणि उपरोक्त प्रकरणी झालेल्या कर्यावाहीबाबत मला अवगत करावे ही विनंती,डॉ.राऊत यांनी केली.