खा.हेमंत पाटीला पाठोपाठ डॉ.वाकोडेवर ही गुन्हा नोंद

नांदेड

नांदेड, बातमी24:- कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर.2वाकोडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हिंगोली खासदार हेमंत पाटील यांनी डॉ.वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावल्या प्रकरणी हेमंत पाटील यांच्याविरुद्ध अँट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.आता मृत्यूस जबाबदार प्रकरणी डॉ.वाकोडे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 41 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन झाली असून मोठी खळबळ उडाली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी बालकासह तिच्या मातेचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली होती. तर, नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि तिचा सुद्धा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणात कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, नातेवाईक रुग्णालयात दाखल असताना बाहेरुन 45 हजारांहून अधिकची औषधी खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडले होते. तसेच रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसेही खर्च करण्यात आले होते. त्यात अधिष्ठाता डॉ. एस. आर.वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केले. डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे माय-लेकाचा मृत्यू झाल्याची तक्रार कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.