सीईओ मिनल करणवाल यांचा टाईम बाऊंड कार्यक्रम ठरतोय अभ्यागतांसाठी करेक्ट टाईम

नांदेड

नांदेड,21- विविध प्रश्न घेऊन अभ्यांगतासह कर्मचारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दाद मागण्यासाठी निवेदन देत असतात. परंतु दिलेल्या अर्जाचे वेळेत निपटारा होत नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या निदर्शनात आले. त्यासाठी त्यांनी 1 ऑगस्ट 2023 पासून अभ्यागतांचे प्रश्न सोडविण्यासाठी टाईम बाउंड प्रोग्रॅम (कालबद्ध कार्यक्रम) राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे अभ्यागतांचे प्रश्न तात्काळ निकाली निघत आहेत.
नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक कार्यालयात ठराविक वेळ देऊन अभ्यागतांच्या भेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून तसेच त्यांची निवेदने घेतली काढली जातात. त्यानंतर सदर निवेदन संबंधित विभागाकडे पाठवले जाते. परंतु त्यावर पुढे काय कार्यवाही होते, त्यांचे प्रश्न निघतात का? याकडे मात्र कोणाचे लक्ष नसते. पुन्हा-पुन्हा ते नागरिक कार्यालयात चकरा मारत असतात. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी हे प्रश्न निकाली काढण्यासाठी टाईम बाउंड कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत अभ्यागतांचे अर्ज संबंधित विभागात गेल्याची नोंद व त्यावर 15 दिवसाच्या आत निकाली निघालेली प्रकरणे याची माहिती सीईओ यांच्या कक्षात ठेवली जात आहेत. त्यामुळे सीईओ मिनल करणवाल यांचा टाईम बाऊंड कार्यक्रम ठरतोय अभ्यागतांसाठी करेक्ट टाईम अशी चर्चा अभ्यंगतामधून असून यावर समाधान व्यक्त होत आहे.

अनेक तक्रारदारांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात. परंतु बऱ्याच वेळा हे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा निकाली काढण्यासाठी बराचसा विलंब होतो. बरेच प्रकरणे धोरणात्मक स्वरूपाची नसतात. छोटे-छोटे प्रश्न देखील सोडवण्यासाठी विभाग प्रमुख विलंब करतात. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी टाईम बाउंड उपक्रमातून अनेक प्रकरणे काढली आहेत. यात काही धोरणात्मक स्वरूपाची प्रकरणे असतील तर विभागीय आयुक्त कार्यालय व मंत्रालयातील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दूरध्वनीव्दारे संपर्क करून तसेच लेखी पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढले जात आहेत. यातील बरेच प्रकरण चर्चा करून निकाली काढण्याजोगी आहेत. त्यामुळे या टाईम बाउंड कार्यक्रमामुळे अभ्यागतांचे प्रश्न तात्काळ निकाली निघत आहेत.

दर सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल ह्या यासंदर्भाने प्रकरण निहाय खाते प्रमुखांचा आढावा देखील घेतात. किनवट, माहूर ,मुखेड,देगलूर आदी तालुक्यातील गावातून नागरिक जिल्हा परिषदेला येत असतात. त्यांची हेलपाट होऊनये यासाठी तालुकास्तरावर देखील पंचायत समिती तेथे तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्या- त्या तालुक्यात संपूर्ण अधिकारी म्हणून नेमून दिलेले खाते प्रमुख नागरिकांच्या तक्रारी स्विकारतात. त्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठविल्या जातात. दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून राबविण्यात येणाऱ्या टाईम बाउंड उपक्रमात दोन महिन्यात 151 प्रकरणे निकाली निघाले आहेत. यात शिक्षण विभाग प्राथमिकचे- 42 प्रकरणे, बांधकाम विभाग – 4, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – 5, सामान्य प्रशासन विभाग- 7, ग्राम पंचायत विभाग- 43, पशुसंवर्धन विभाग- 1, आरोग्य विभाग – 7, ग्रामीण पाणी पुरवठा- 10, महिला व बाल विकास विभाग- 17, शिक्षण विभाग माध्यमिक- 4, समाजकल्याण- 8, वित्त विभाग-2 तर नरेगा विभातील 1 असे एकूण 151 प्रकरणे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या टाईम बाउंड उपक्रमात निकाली निघाली आहेत.