नांदेड,बातमी24:-आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात राखीव असलेल्या बिलोली-देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांना उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी नांदेड येथे झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीशी संबंधित असलेले परंतु विविध पक्ष संघटनेत कार्य करणारे आणि आंबेडकरी विचारधारा जपणारे 50 हून अधिक प्रमुख नेते-पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
संयोजक कुलदीप चिकाटे यांनी पुढाकार घेऊन विविध पक्ष संघटनेत कार्यरत असलेल्या या नेते आणि पदाधिकार्यांना एकत्रित आणण्याची किमया साधली. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत वर्तमान परिस्थितीत आंबेडकरी चळवळ आणि राजकारण दिशाहीन झालेले आहे. याबाबत गांभीर्याने चिंता व्यक्त करण्यात आली. आंबेडकर चळवळीत वाढलेले आणि उदयास आलेले अनेक नेते, पदाधिकारी इतर पक्ष संघटनेत काम करतात, परंतु त्यांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नाही, याबाबत खंत व्यक्त करत आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी बिलोली-देगलूर या राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने बौद्ध उमेदवार म्हणून सुरेशदादा गायकवाड यांना संधी द्यावी, ही मागणी घेऊन काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाशी चर्चा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
आजपर्यंत बौद्ध समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, याला आपलीच दिशाहीनता कारणीभूत असल्याचे चर्चिल्या गेले. आपल्यातील असलेले हेवेदावे आणि वैचारिक मतभेद विसरून आंबेडकरी चळवळ आणि राजकारण गतिमान करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही बौद्धांना अधिकाधिक कसे प्रतिनिधित्व मिळेल, या अनुषंगाने पुढील दिशा ठरविण्यासाठी नांदेड येथे झालेल्या बैठकीसारखेच प्रत्येक तालुकास्तरावर बैठका घेऊन दिशाहीन झालेल्या सर्व नेते आणि पदाधिकार्यांना एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या या बैठकीत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड, रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक रमेशदादा सोनाळे, माजी नगरसेवक श्रीकांतदादा गायकवाड, माजी नगरसेवक सुभाष रायबोले, माजी जि.प. सदस्य साहेबराव धनगे, कुलदीप चिकाटे यांच्यासह अनेकांनी आपले मत व्यक्त केले.
या बैठकीला माजी नगरसेवक तथा अंगुली सेनेचे प्रमुख बाळूभाऊ राऊत, माजी सभापती रमेश सरोदे, आंबेडकरी चळवळीतील नेते प्रा. देवीदास मनोहरे, पी.एस. गवळे, भाजपाचे साहेबराव गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे संदीप मांजरमकर, प्रभू सावंत, नंदकुमार बनसोडे, सुभाष काटकांबळे, जनार्दन कवडे, रवी गायकवाड, पत्रकार दत्ताहरी धोतरे, संजय नरवाडे, बाबुराव कसबे, भगवान तारू, प्रितम जोंधळे, आर.व्ही. वाघमारे, पद्माकर सोनकांबळे, शीलरत्न चावरे, अशोक कांबळे, अॅड. दिगंबर गायकवाड, सचिन आठवले, प्रशांत सोनकांबळे, धम्मा ढवळे, कावलगावचे माजी सरपंच कांबळे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.