आमदार आणि जिल्हाधिकार्‍यांनी घेतला दुचाकीवर शोध

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघात वाळू माफि यांनी थैमान घातले आहे. आमदारांनी तक्रार केल्यानंतर शहानिशा करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी व आमदाराने वाळू वाहतुकीच्या जड वाहनामुळे चाळणी झालेल्या रस्त्यावरून चारचाकी वाहन जाणे अशक्य असल्याने दुचाकीवर वेगवेगळया भागांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी व आमदार दुचाकी चालवित असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. तर वाळूमाफि यांचे धाबे दणाणले.

नायगाव मतदारसंघात वाळू माफि यांनी चालविलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात आमदार राजेश पवार यांनी आवाज उठविला आहे. कोणत्याही प्रकारचा वाळू उपसा होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वाळूमाफि यांना शेतकर्‍यांनी थारा देऊ नये, वाळू उपसा थांबला पाहिजे, आदी मुद्यांवर ते प्रशासनाला ही धारेवर धरत आहे.

यासंबंधात आ. पवार यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वाळू वाहतुकीमुळे चाळणी झालेल्या मेळगाव, धनज, कुंटूर, सांगवी या गावांना जाणारे रस्त्यांची पाहणी केली. ही पाहणी करण्यासाठी चारचाकी वाहन चालणे अशक्य असल्याने दुचाकीला किक मारत आमदार राजेश पवार यांच्यासोबत रस्त्यांची पाहणी केली. अशा रस्त्यांची झालेली दैना पाहून डॉ. इटनकर यांनी खंत व्यक्त केली. या भागातील रस्ते दुरुस्त होईपर्यंत वाळू वाहतुक करणारे जड वाहनांवर या मार्गावरून बंदी घालण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना डॉ. इटनकर यांनी दिले.