नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासामध्ये विमा कंपनीस कळवावी:- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

कृषी

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसुचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनीकडून अटी व शर्तीनुसार होते. नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंअंतर्गत पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पाणी ओसंडून वाहिल्याने अथवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे विहिर किंवा शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना विमा कंपनीस देणे अत्यावश्यक आहे. पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance (क्रॉप इन्शुरंन्स) हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी  किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर  संपर्क साधावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी [email protected] या पत्यावर ई- मेलवर नुकसानीची पुर्वसुचना द्यावी.
काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास  किंवा आपल्या  गावातील संबधित कृषि  सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करु शकतील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
0000