नांदेड, बातमी24ः गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचना, निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी यांनी 8 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव सण साजरा करण्यासंबंधी 1 ते 12 सूचना व उपाययोजना निर्गमित केल्या होत्या. यामध्ये सार्वजनिक गणेशमंडळाच्या ठिकाणी व मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी 50 वर्षावरील नागरिकांना व 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही.
त्याचप्रमाणे कोव्हीड -19 या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने व जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गत केलेले आदेश, निर्देशाचे पालन करणे बंधनकारक असणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन शक्यतो स्थानिक स्वराज्य संस्थानी जसे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादींनी गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव, हौदामध्ये विसर्जनासाठीच्या संकलन केंद्रातच गणेशमूर्ती सुपूर्द, जमा करण्यात यावेत.असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.