जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे महानगर पालिकेच्या कारभारावर विशेष लक्ष असते. मात्र ते जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व सत्ताधार्यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष करतात. त्त्यामुळे साठ वर्षांच्या काळात सहा महिन्यांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त राहिल्याची काळया अक्षरात घेण्यासारखी नोंद झाली आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची नांदेड येथून पुणे येथे मार्च महिन्यात दि. 18 रोजी बदली झाली. तेव्हापासून ते आजमितीस जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी मिळालेला नाही. थेट आयएएस अधिकार्यांमधून नांदेड येथे येण्यास कुणी इच्छूक किंवा उत्सुक नाही, हे खरे आहे. यास राजकारण्यांचा अनावश्यक हस्तक्षेप कारणीभूत असल्याचे बोलले जाते,तशी अधून-मधून चर्चा झडत असते. त्यामुळे थेट आयएएस अधिकारी आणणे अशोक चव्हाण यांच्यासाठी अशक्यप्राय बाब म्हणावी लागेल.
पदोन्नतीने आयएएस नामांकनाच्या तयारीत असलेल्या अधिकार्यांमध्ये काही जण नांदेड येथे येण्यास उत्सुक असले, तरी त्यांच्या नावावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून चाळणी किंवा ताक फु कून पिल्यासारखे होत आहे. या कारणामुळे जे कुणी नांदेड येथे सीईओ म्हणून येण्यास इच्छूक आहेत. त्यांचे नाव सुद्धा अंतिम होत नसल्याचे बोलले जात आहे. सीईओ सारखे पद तेही नांदेड सारख्या बलाढया जिल्ह्यात रिक्त राहत असणे किंवा ठेवणे हे राज्यकर्त्यांचे एकाप्रकारे अपयश म्हणावे लागणार आहे.
पालकमंत्री अशोक चव्हाण हे राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. उत्तम प्रशासक राजकारणी अशी त्यांची राज्यभर ओळख असताना अशा प्रशासक राजकारण्याच्या नजरेत सीईओ पदाबाबत इतके कसे काय दुर्लक्ष होऊ शकते. याबाबत येथील प्रशासकीय अधिकारी व राजकारण्यांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी आता अशोक चव्हाण यांना लक्ष घालावे लागणार असून पहिले प्रथम पूर्ण वेळ तेही कडक शिस्तीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणून बसविल्यास सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वकांशी कामे व योजना मार्गी लागू शकतात.