सावित्रीबाई फुलेंना अभिवादन; वेबिनारव्दारे सिईओ ठाकूर यांचा संवाद

ताज्या बातम्या

नांदेड,बातमी24- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार तळा-गाळापर्यंत पाहोचविण्यासाठी तसेच सावित्रींच्या लेकींना आत्मनिर्भर करण्यासाठी वर्षभर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षक दिन आज जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. यावेळी वेबिनारव्दारे जिल्हयातील सर्व शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या, गावस्तरापासून अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर तसेच विविध महिला अधिकारी व कर्मचारी नौकरी करुन घराची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हया आपल्या रोल मॉडेल असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे कार्य पुढे नेणे आज काळाची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर जिल्हा परिषदे अंतर्गत चांगले कार्यक्रम राबविण्याचा मानस जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व उपाध्यक्षा पद्मारेड्डी सतपलवार यांचा आहे. त्यानुसार महिलांसाठी कार्यशाळा, आरोग्य तपासणी, महिला कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वित्तीय बाबींसंदर्भात प्रशिक्षण, नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, व्याख्यान, परिसंवाद, मुलींचे शिक्षण व संरक्षण आदी कार्यक्रम वर्षभरात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.

तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व उपाध्यक्षा पद्मारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे यांनी क्रांतीज्याती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पूजन करुन अभिवादन केले. तसेच यानिमित्त सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वेबिनारमध्ये आज जिल्हयातील महिला शिक्षिका, शिक्षणतज्ञ, प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पालक व विद्यार्थी यांच्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये नांदेड तालुक्यातील काकांडी व माहूर तालुक्यातील वानोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जिवनपटावर आधारीत उत्कृष्ट एकांकीका सादर केल्या.