हिंगोली, बातमी24ः दैनिक सामनाचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते 41 वर्षांचे होते.
योगेश पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने औरंगाबाद येथील नंदलाल धुत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारच्या रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथेच सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. योगेश पाटील यांनी नांदेड, जळगाव जिल्ह्यात पत्रकार म्हणून काम केल्यानंतर हिंगोली या जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली.
पश्चात पत्नी, दीड वर्षांचा मुलगा, आई, बहिण असा परिवार असून दिवंगत योगेश पाटील हे मुळचे धर्माबाद येथील राहिवासी आहे.तालुका प्रतिनिधी ते जिल्हा प्रतिनिधी अशी अल्पावधीत मजल मारली होती. दांडगा जनसंपर्क असलेल्या पत्रकार निघून गेल्याने सर्वक्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.