नांदेड, बातमी24:- कोरोनाच्या संक्रमण काळात विजबिले भरु न शकलेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत न करता प्रत्यक्ष भेट घेवून साधलेल्या सुसंवादातून नांदेड परिमंडळाने ३२ कोटी २६ लाख रूपयांच्या विज देयकांची वसूली केली आहे. मराठवाडा विभागातून सर्वाधिक वसुली नांदेड परिमंडळात झाली आहे.
महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या संकल्पनेतून सुसंवादाची ही मोहीम राबविली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणकडुन कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत नाही. वीज ग्राहकांनी वीजबिले भरण्यासाठी स्वत:हुन पुढे यावे,यासाठी विनंती, सुचना, पत्रव्यवहार, व्हॉटसॲप, एसएमएस व प्रत्यक्ष भेट घेवून सुसंवाद साधण्याच्या सुचना डॉ. नरेश गिते यांनी दिल्या होत्या. त्याचबरोबर थकबाकी वसुली करणे सोपे जावे यासाठी रेड, यलो आणि ग्रीन झोन अशी वर्गवारी करुन टॉप १०० ग्राहकांची यादी तयार करुन देण्यात आली होती.
यानुसार विजग्राहकांना कसल्याही प्रकारचा त्रास न देता सुसंवाद साधत थकबाकी वसुलीचे उध्दिष्ट साध्य् करण्याच्या सूचना दिल्या होत्या.ग्राहकांनीही या मोहिमेस प्रतिसाद देत वीज देयकांचा भरणा केला आहे
ग्रीन झोनमध्ये असलेल्या नांदेड परिमंडळातील वीज ग्राहकांनी २४ सप्टेबर अखेर ५ कोटी ११ लाखांचा भरणा केला आहे. यलो झोन मधील १३ उपविभागातील वीजग्राहकांनी १४ कोटी ७८ लाखांचा भरणा केला आहे. त्याच बरोबर रेड झोन मधील १० उपविभागातील वीज ग्राहकांनी १२ कोटी ३७ लाखांचा वीज बील भरणा केला आहे.