नांदेड,बातमी24:U- नांदेड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी शंभर टक्के अर्थ सहाय्य व शारिरीक दिव्यांग घालवण्यासाठी लागणारे उपकरणे-अवयव व वैद्यकीय उपचारासाठी लाभ देण्यात येतो. चालू वर्षात ग्रामीण भागातील 938 दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा परिषद शेष निधीतून 1 कोटी 19 लाख 7 हजार 50 रुपये लाभ देण्यात आल्याची माहिती समाजकल्याण सभापती अॅड रामराव नाईक यांनी दिली आहे.
पूर्वी दिव्यांगांना लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज सादर करावे लागत होते, त्यामुळे विलंब होत होता. परंतू जिल्हयाचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्या कल्पनेतून दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी दिव्यांग मित्र नांदेड अॅप निर्माण करण्यात आले. या अॅपवर लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. या अॅपव्दारे ग्रामीण भागातून 11 हजार 834 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी तालुकास्तरावरून गट विकास अधिकारी यांनी 3 हजार 82 अर्जांची शिफारस केली होती. परंतु निकषानुसार जिल्हास्तरावर या अर्जांची छाननी करण्यात आली.
यात यापूर्वी लाभ घेतलेले लाभार्थी, वस्तूंची मागणी न केले लाभार्थी यांना वगळून निकषानुसार जिल्हयातील 938 लाभार्थी पात्र ठरले. त्यानंतर सदर पात्र यादीस समाजकल्याण सभापती अॅड रामराव नाईक, समाजकल्याण अधिकारी आर.एच. ऐडके, समिती सदस्य व संबंधीत शाखेचे प्रमुख यांनी सदर यादीला मंजूरी देवून लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यामुळे सदर लाभार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्य निर्माण झाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
चौकट
त्रूटीची पूर्तता करणा-या लाभार्थ्यांस लाभ देण्यात येईल
यापूर्वी दिव्यांग मित्र अॅप मध्ये अर्ज सादर करतांना लाभार्थ्यांच्या काही चूका झाल्या आहेत. काही लाभार्थ्यांनी कागदपत्रे सोबत जोडलेली नाहीत अशा लाभार्थ्यांचा अर्ज अपात्र ठरला. या लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांनाही लाभ देण्यात येईल असे समाजकल्याण सभापती रामनाव नाईक यांनी सांगीतले.
चौकट
लाभार्थी निवडीचे निकष
दिव्यांगांसाठी लाभ घेणा-या लाभार्थ्यांचे वार्षीक उत्पन्न एक लाख रुपये असावे, किमान 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगांचे प्रमाणपत्र, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, यापूर्वी लाभ घेतलेला नसावा, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बॅक पासबुकची सत्यप्रत इत्यादी दिव्यांग मित्र अॅपमध्ये माहिती भरतांना सदर कागजपत्र जोडणे आवश्यक आहे.