जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या;अन्यथा कारवाई होईल:-सीईओ वर्षा ठाकूर यांची ताकीद

नांदेड

नांदेड,बातमी24:-ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रांना डिसेंबर अखेर शंभर टक्के नळजोडणीचे काम पुर्ण करावे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे आराखडे पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले.

आज बुधवार दिनांक 15 डिसेंबर रोजी भोकर पंचायत समिती येथे अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार राजेश लांडगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर गट विकास अधिकारी अमित राठोड आदींची उपस्थिती होती.

पुढे त्या म्हणाल्या, येत्या 2024 पर्यंत राज्यातील सर्व गावांना प्रतिव्यक्ती 55 लिटर प्रमाणे शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने 90 दिवसाचा कार्यक्रम हाती घेतला आहे, त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
तसेच 100% कोविड लसीकरण करणे, गाव तिथे स्मशानभूमी, माझी वसुंधरा, घरकुल योजना, थोडेसे मायबापासाठी, सार्वजनिक शौचालय बांधकाम आदी बाबतीत त्यांनी यावेळी आढावा घेतला. घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ग्रामसेवकांनी लाभार्थी
घरे बांधावयास तयार नाहीत असे निवेदन केले. यावर प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना बांधकाम साहित्य व बांधकाम करणारी माणसं याची उपलब्धता कशी होईल या पद्धतीने नियोजन करून डिसेंबर अखेर घरकुलाची कामे मार्गी लावण्याबाबत सूचित केले. प्रत्येकाने रुटीन पद्धतीने विचार न करता परिघाबाहेर विचार करून काम करावे. तसेच नाविन्यपूर्ण कार्यक्रम कसे आखता येतील यावर विशेष भर द्यावा, असेही त्या यावेळी म्हणाल्या. या बैठकीला तालुक्यातील तलाठी, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, उपअभियंता, पंचायत समितीचे खातेप्रमुख आदींची उपस्थिती होती. भोकर दौ-या दरम्यान त्यांनी नारवट व हाडोळी ग्रामपंचायतीला भेट देऊन कामांची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.