मंत्री चव्हाण यांच्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन; शेकडो मराठा युवकांचा सहभाग

नांदेड महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती उठविण्यात यावी, या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले.

मराठा आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे संबंध महाराष्ट्रातून मराठा समाजातून संतापाची लाट उसळली आहे. या मुद्दावरून राज्यातील महाआघाडीचे सरकार सुद्धा हतबल झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे एकापप्रकारे पेच निर्माण झाला, असून मराठा समाजाच्या विविध सामाजिक संघटना आरक्षणावरील स्थगिती हटविली पाहिजे, यासाठी आक्रमक झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छावा संघटनचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वात मराठा छावा संघटनेच्या वतीने अशोक चव्हाण यांच्या घरासमोर गुरुवार दि. 17 सप्टेंबर रोजी आंदोलन चालविले.

आंदोलक हे अशोक चव्हाण यांच्या घराच्या दिशेने जात असता, पोलिसांनी आंदोलकांना अडविले. घराच्या बाहेर लावलेल्या बॅरीकेटसमोर आंदोलनकांनी ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. या आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. खुद नानासाहेब जावळे या आंदोलनात उतरल्याने मराठा समाजातील युवकांचा मोठा सहभाग राहिला आहे.