ग्रामीण भागातील नागरिकांचे मधुमेह, उच्चरक्तदाब व कॅन्सर तपासणी होणार:-सीईओ वर्षा ठाकूर

नांदेड

नांदेड,बातमी24:- मधुमेह, उच्चरक्तदाब व कॅन्सर सारखे गंभीर आजार आहेत. यावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. शहरी भागात उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण भागात या सुविधा नाहीत. कुठल्याही आजाराचा शिरकाव लोकांना कळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात प्राथमिक तपासण्‍या वाढवून त्याचा निरंतर पाठपुरावा करत अडगळीतील वंचित माणसांना सुखी आयुष्य देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एक महिन्‍यात स्‍क्रीनिंग पूर्ण करून याद्या अद्ययावत कराव्यात अशा सूचना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज दिल्या.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त व थोडेसे मायबापासाठी पण या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांची मधूमेह, उच्चरक्तदाब व कर्करोग तपासणी, निदान व उपचार या विषयावर आज मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्‍हाण जिल्‍हा नियोजन भवन येथे आढावा बैठक व कार्यशाळा घेण्यात आली, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधव, मधुमेह तज्ञ डॉ. विजय बरडे, औषधोपचार तज्ञ डॉ. मोहम्मद तज्जमुल पटेल, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मनुरकर, योगतज्ञ मधुकर भारती, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. उमेश मुंडे, डॉ. साईप्रसाद शिंदे यांची उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणल्‍या, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे स्ट्रोक हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरतात. तसेच तंबाखू व मद्यपानाच्या सेवनाने मुख कर्करोगाचे प्रमाण वाढलेले आहेत. ग्रामीण भागात हे प्रमाण रोखण्यासाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 जानेवारी 2022 पासून ग्रामीण भागातील व्यक्तींचे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग या आजाराचे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर तपासणी व निदान करून उपचार केले जाणार आहेत. दरम्यानच्या कालावधीत स्क्रीनिंगची माहिती NCD अँपमध्ये अद्यावत करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. या कार्यशाळेत मधुमेह तपासणी, निदान व उपचार, उच्च रक्तदाब, स्तनकर्करोग, गर्भाशयमुख कर्करोग, योगा आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.