शासनाच्या उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी:सीईओ ठाकूर

नांदेड

नांदेड,बातमी24- गाव स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेच्या कामांना केंद्रस्थानी ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामे पूर्ण करावीत. तसेच राज्य शासनाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करावी, यासाठी विशेष उपक्रम आयोजित करावेत असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा त्यांनी आज दीर्घ आढावा घेतला.
आज शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जनजागृती विद्यालय लिंगनकेरूर तालुका देगलूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्‍वय सभा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मंजुषा कापसे, व्‍ही.आर. पाटील, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर कुलकर्णी, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, प्रशांत दिग्रसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्रभारी कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, ए.आर. चितळे, सागर तायडे, एस.जी. गंगथडे, देगलूरचे गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांच्यासह खाते प्रमुख, गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थिती होती.
पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करताना दूरदृष्टी ठेवून कामे करावीत. कामाविषयी नागरिकांच्या तक्रारी येतात. त्या तक्रारी अधिकाऱ्यांनी समजून घ्याव्यात. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी जनजागृती विद्यालयाचे संचालक गोपाळ नाईक, पंचायत समिती देगलूर व ग्रामसेवक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा फेटा, वृक्ष, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी परेड संचालन करुन विविध कला गुण सादर केले.
शोषखड्ड्यांच्या माध्यमातून गाव स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करण्याच्या उपक्रमालाही आता जिल्ह्यात गती देण्यात येणार आहे. त्यासोबतच वृक्ष लागवडीसाठी हर घर नर्सरी, डिजिटल शाळा, ई-ग्रंथालय, माझी वसुंधरा, स्मार्ट गाव, हागणदारी मुक्त अधिक गाव यासह आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या समन्वय सभेमध्ये त्यांनी ग्रामपंचायत विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण घरकुल योजना, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, शालेय शिक्षण, समाज कल्याण, आरोग्य, जलसंधारण, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वच्छ भारत मिशन, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास विभाग यासह महाराष्ट्र गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, वित्त व सामान्य प्रशासन या विभागाचा सविस्तर आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला. यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 234 पाणी पुरवठा योजनेचे आराखडे पूर्ण करून या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आले आहेत. कमी कालावधीत हे काम पूर्ण केल्याबद्दल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील व त्याच्या टीमचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात शोषखड्ड्यांचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे लांजी तालुका माहूर येथील सरपंच मारुती रेनगुलवार, टेंभुर्णीचे ग्रामसेवक आनंद कदम, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील यांनी हर घर नर्सरी या विषयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी सादरीकरण केले.