घरोघरी मुली-महिलांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवा: सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन

नांदेड

नांदेड,बातमी24:- देशभर हर घर तिरंगा या अभियानाची तयारी पूर्णत्वाकडे गेली असून 13 ते 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज हा शक्यतो मुली व महिलांच्या हस्ते फडकावून महिलांचा सन्मान करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.

आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा केला जात आहे. या निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरांवर दिनांक 13 ते 15 आगस्ट दरम्‍यान तिरंगा ध्वज लावला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने 1 हजार 310 ग्रामपंचायतीमध्ये 4 लाख 94 हजार घरांवर तिरंगा ध्‍वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदकडून देणगी स्वरूपात झेंडे वाटपाचे नियोजन केले असून बचत गटांच्या माध्यमातून झेंडे पोहचविण्याचे काम सुरू आहे. यात आतापर्यंत अडीच लाख झेंडे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात पोहचविण्यात आले आहेत. पुढील तीन दिवसात उर्वरित सर्वच ध्वज गावस्‍तरावर पोहचणार असून 4 लाख 94 हजार घरांवर तिरंगा ध्‍वज लावण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

घरघर तिरंगा अभियान अभियानातंर्गत ग्रामीण भागातील 15 हजार बचत गटांना रोजगार देण्याचे काम या निमित्ताने झाले आहे. तिरंगा ध्‍वज बचत गटांच्या माध्यमातून विक्री केली जात आहेत. यातून रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याचे वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. घर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी पुढील काळात माहिती-शिक्षण व संवाद या त्रिसूत्रीचा अवलंब केला जाणार आहे. जागृती हा त्यामधील महत्वाचा भाग असणार आहे. या प्रक्रियेत जिल्हा परिषदेची सर्व यंत्रणा सक्रिय असून दिनांक 10 ऑगस्‍ट रोजी जिल्‍हयातील प्रत्येक शाळेत देशभक्तीपर समुह गीत गायणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. शक्यतो घरांवर ध्वज महिला किंवा मुलींच्या हस्ते फडकावून घरा-घरांमध्ये मुली व महिलांचा सन्मान वाढवावा असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांना जिल्हा परिषदेच्या वतीने तिरंगा ध्वज देण्यात आला.
यावेळी पंचायत सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, महिला व बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही. आर. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे आदींची उपस्थिती होती.