पिक विमा कंपनीच्या  चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे दिले निर्देश

नांदेड
नांदेड,बातमी24:-
तांत्रिक चुकांपायी शेतकऱ्यांना जर पीक विमा मिळत नसेल तर ही सारी प्रक्रियाच गांभीर्याने तपासून पहावी लागेल, असा संतप्त इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या पीक विमा, अतिवृष्टी नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते.
पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देतांना जवळ-जवळच्या गावातही वातावरण बदलाचे तांत्रिक कारण देत भेदभाव करुन विमा देणे सोयीने टाळल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी माझ्याकडे दिल्या आहेत. यात बारड, मुदखेड, वसरणी, आष्टी, हदगाव, लिंबगाव, तरोडा, अर्धापूर, दाभड, निवघा, मुगट आदी गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीशी निगडीत हा एैरणीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही अधिक गंभीर आहोत. जिल्ह्यातील विविध मंडळात असलेल्या या हवामान तपासणी यंत्राची अवस्था, त्यातून नोंदली जाणारी हवामानाची आकडेवारी व केवळ याच्या आधारे पिक विमा कंपन्यांकडून ठरविली जाणारी नुकसान भरपाई व सोईचे अहवाल या साऱ्या व्यवस्थेबाबत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शासन निर्णयाप्रमाणे चौकशी समिती गठीत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
ही समिती येत्या दहा दिवसात मंडळ निहाय वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.