पावती नसेल तर रेती साठा करणाऱ्या व्यक्तीं विरुध्द कारवाई:जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

नांदेड

नांदेड,बातमी 24:-मनपा, नगरपालिका, ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी बांधकाम व्‍यावसायिकांनी वाळु, रेती विकत घेताना वैध पावती व परवाना असल्‍याशिवाय खरेदी करु नये. अन्‍यथा संबंधीताविरुध्‍द कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला  आहे.

जिल्‍ह्यातील जप्‍त रेती साठयाच्‍या लिलावाच्‍या अनुषंगाने करावयाची कार्यपध्‍दती शासन निर्णय 3 सप्टेंबर 2019 अन्वये निश्‍चीत करण्‍यात आलेली आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी रेती साठे आढळुन येत आहेत. लिलाव झालेला नसताना येवढया मोठया प्रमाणात रेती साठे उपलब्ध असणे हे अवैध उत्‍खनन व वाहतुकीव्‍दारे उपलब्‍ध असल्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात बांधकामाच्‍या ठिकाणी बांधकाम व्‍यावसायिकांनी रेती साठा करत असताना अशी रेती ज्‍यांच्या कडुन घेतली आहे. त्याबाबतची वैध पावती किंवा इतर सक्षम पुरावा संबंधीत बांधकाम करणाऱ्या मालकाकडे असणे आवश्‍यक आहे. जर असा पुरावा संबंधीत मालकाकडे नसेल तर अशा खाजगी जमीनधारक, बांधकाम व्‍यावसायिक यांचे विरुध्‍द महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम, 1966 मधील कलम 48 मधील पोट कलम (7) व (8) नुसार दंडात्‍मक कार्यवाही किंवा इतर कायदेशीर कारवाई  करण्‍यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.
0000