कौशल्य साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन

नांदेड

नांदेड,बातमी24 :- शैक्षणिक गुणवत्तेसमवेत कौशल्याची जोड असेल तर रोजगाराच्या संधी अधिक विस्तारतात. प्रत्येकाने आपल्या कुशल कौशल्यातून ओळख निर्माण करावी व नाविण्यपूर्ण कामावर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या 90 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना पुणे येथे आज प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा समन्वयक इरफान खान, परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक परमेश्वर राजबिंडे, कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत कंपनीच्या प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी भविष्यात असे रोजगार मेळावे घेतले जातील. जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधीसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी केले.

स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 1 जून 2022 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यात एकुण 9 नामांकीत कंपन्यानी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत महिंद्रा अँड महिंद्रा, पुणे या कंपनीसाठी एकुण 367 एवढया विद्यार्थ्यांची मुलाखत घेवून 90 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. या कंपनीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महिंद्रा अँड महिंद्रा (प्रा.लि.) चाकण पुणे येथे कंपनीच्या वाहनातून जाण्याची व्यवस्था करण्यात आली,,