देवस्वारी, पालखी मिरवणूकीने माळेगाव यात्रेला सुरूवात:-जि. प.सीईओ मिनल करणवाल

नांदेड

नांदेड, बातमी24:-दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेची सुरुवात दि. १० जानेवारी रोजी देवस्वारी, पालखी मिरवणूकीने होणार आहे. यावेळी विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात येईल. ही यात्रा चार दिवस भरवली जाणार आहे. यात्रेत जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटाचे वस्तू प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषदतर्फे आयोजित करण्यात आले आहेत,अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
माळेगाव यात्रेच्या निमित्ताने आज शुक्रवार दि.5 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मालोदे, प्रकल्प संचालक संजय तुबाकले, सामन्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी  मुक्कावार, पंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी मंजुषा कापसे, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, अमोल पाटील, विनोद रापतवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना करणवाल म्हणाल्या, की दि. १० रोजी देवस्‍वारी, पालखी, मिरवणूक व विविध स्टॉलचे उद्घाटन, कृषी प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा, दि. ११ रोजी गायवर्ग पशु, अश्व, शेळी, कुक्‍कुट व श्वान प्रदर्शन व दि. १२ रोजी कुस्त्यांची भव्य दंगल, दि. १३ रोजी लावणी महोत्सव आणि १४ रोजी कलामहोत्सव व पशुप्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण व यात्रेचा समारोप कार्यक्रम करण्यात येणार आहे.
यात्रेपूर्वी कराव्याच्या उपायजोजनात जिल्हा वार्षिक योजना यात्रेचा विकास अंतर्गत बायपास रोडचे मजबुतीकरण, अंतर्गत रस्ते, अंतर्गत पाईपलाईन दुरुस्ती, पशुप्रदर्शन स्टेज दुरुस्ती व जमीन सपाटीकरण करणे. तीर्थक्षेत्रांतर्गत सटवाई तलावाचे सुशोभीकरण करणे इत्यादी कामे मंजूर करून यात्रेपूर्वी पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा परिषद स्वउत्पादनातून विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे करणवाल यांनी सांगितले.

……
यात्रेवर सीसीटीव्हीची नजर
यावर्षी प्रथमच यात्रेमध्ये सीसीटीव्ही कॅमेराव्‍दारे नियंत्रण करण्यात येणार असून यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे.