नांदेड जिल्हा परिषदेचे घर घर लसीकरण; अधिकारी-कर्मचारी रजा रद्द

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी चिंतेचा विषय ठरणारी असून यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने घर-घर लसीकरण हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर जाऊन लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे लागणार आहे,यासाठी अधिकारी-कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्याचा निर्णय सीईओ वर्षा ठाकूर यांनी घेतला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सीईओ वर्षा ठाकूर यांनी श्राव्य माध्यमाद्वारे दिलेल्या संदेशात म्हंटले,की कोरोनाच्या नव्या विषाणूजन्य संसर्गापासून दूर ठेवणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. नांदेड जिल्हा लसीकरणात पिछाडीवर राहणे ही भूषणाची बाब नाही.त्यामुळे दि.8 ते 15 डिसेंबरपर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून ग्रामसेवक,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका तसेच सर्व शिक्षक मंडळींना गावातच कॅम्प करून राहावे लागणार आहे. या कामात हलगर्जीपणा किंवा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद,सीईओ वर्षा ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून दिली.

या मोहिमेत मी स्वतः गावो गावी जाऊन आढावा घेणार असून या कामी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर अधिकाऱ्यांची पथके नेमण्यात आली आहे. हे पथके प्रत्यक्ष गाव पातळीवर जाऊन नागरिकांचे प्रबोधन करणार आहे.

याचसोबत गाव पातळीवर सरपंच व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य करण्याच्या सूचना वर्षा ठाकूर यांनी दिल्या.जे कर्मचारी वैधकीय रजा वगळता सर्व कर्मचाऱ्यांना सेवेवर हजर राहावे लागणार असल्याचे वर्षा ठाकूर यांनी सांगितले.