जि.प.च्या बदल्यास जिल्हाधिकार्‍यांचा विरोध; निर्णय प्रभारी सीईओंच्या कोर्टात

नांदेड

नांदेड, बातमी24ः बहुचर्चित जिल्हापरिषदेच्या विविध विभागातील विविध संवर्गाच्या बदल्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात येऊ नये. यामुळे कोरोना विरोधातील उभी करण्यातील आलेली कर्मचार्‍याची साखळी तुटू शकते, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी विरोध स्पष्ट नोंदविला असल्याने यासंबंधीचा निर्णय प्रभारी सीईओंच्या कोर्टात गेला आहे. प्रभारी सीईओ या प्रकरणात तळयात-मळयात राहतात, की स्पष्ट भूमिका घेतात, यासंबंधीचा निर्णय सायंकाळपर्यंत कळणार आहे.

जिल्हा परिषदमधील बदल्यांची प्रक्रिया दि. 26 जुलैपासून सुरु होणार आहे. कोरोनाचे मोठे संकट आहे. बदल्यांच्या काळात जिल्हापरिषदेत मोठी गर्दी वाढू शकते. जिल्ह्यात झपाटयाने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हा परिषदमधील बदल्यांबाबत मत-मतांतरे व्यक्त होत आहेत. बदल्या करू नयेत, या भूमिकेत काही विभागप्रमुख आहेत. मात्र प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी यांना सुद्धा विभागप्रमुखांना उघडपणे विरोध करता येईना असे झाले आहे.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी नियम अधिक कडक करण्यावर भर दिला आहे. बाजारपेठांना सुद्धा नियम लावले जात आहे. पूर्वी नांदेड शहरात रुग्ण आढळून येत असत. आता कोरोनाचे लोण ग्रामीण भागात घुसले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्मचारी कमी पडत आहेत. बदल्या झाल्या आणि यात काही आक्षेप असल्यास संबंधित कर्मचारी रुजू होत नाही. न्यायालय किंवा आयुक्तालयात जातो. यावर मोठा परिणाम ग्रामीण भागातील साखळी तोडण्यास होऊ शकतो.

ग्रामीण भागात कर्मचार्‍यांची यंत्रणा व्यवस्थित बसली आहे. बदल्यांमुळे यंत्रणा तुटू शकते. याबाबत प्रशासन गांभीर्याने घ्यायला तयार नाही. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बदल्या करण्यात येऊ नये, असे स्पष्टपणे मत नोंदविले आहे. प्रभारी सीईओ बदल्या करण्यातबाबत उत्सुक असे वरवर दिसत आहे. ठोस भूमिका सीईओंनी घेतल्यास बदल्यांची प्रक्रिया अनावश्यक सुरु असलेली थांबू शकते. मात्र प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी यांनी तशी इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे.
——-
पदाधिकारी-अधिकारी मतांना प्रधान्य आवश्यक
जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकार्‍यांचा सुद्धा कोरोनाच्या संकटांचा विचार करता बदल्या करू नये,अशी भूमिका आहे. बहुतांशी अधिकारी सुद्धा त्याच मतावर आले आहेत. डॉ. शरद कुलकर्णी यांनी प्रत्येकाला विश्वासत घेऊन मत जाणून घेतल्यास बदल्या करायच्या की, नको याबद्दल चित्र स्पष्ट होईल.