प्रचंड मोर्चाने भरविली शंकर अण्णा धोंडगे यांनाच राजकीय धडकी;  शेतकऱ्यांचा नगण्य प्रतिसाद;पक्षाची प्रतिष्ठेवर प्रश्न चिन्ह!

नांदेड

नांदेड,बातमी24:-याच महाराष्ट्राच्या भूमीतून एकही नेता नसताना हजारोच्या सभा घेऊन राष्ट्रीय नेतृत्व सिद्ध करणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री सी.चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने सगळ्यांना भुरळ घातली खरी;पण ज्यांच्याकडे या राज्याची सूत्र दिले,त्या माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांच्या कालच्या प्रचंड शेतकरी धडक मोर्चाला किमान शंभर ही माणसे न जमविता आली नाहीत.राज्याचे नेतृत्व करण्याची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या शंकर अण्णा यांनी कालच्या मोर्चाने स्वतःच राजकीय आस्तिस्तव नसल्याचे दर्शवून दिले,शिवाय जिल्ह्यातील एकही नेता सोबत नसल्याचे समोर आले.परकोटीची राजकीय मनशा अन प्रचंड मोर्चाने पक्ष विस्ताराला नांदेडमधूनच घालून दिलेली मर्यादा या तितक्याच आरशासारख्या सत्य व स्पष्ट असल्याचे सिद्ध होते.

 

भारत राष्ट्र समितीचे राज्यप्रमुख शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेत्रत्वाखाली शेतकऱ्यांचा धडक मोर्चा दि.14 रोजी काढण्यात आला.मागण्या या लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील होत्या. कदाचित हा मोर्चा कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयावर ही काढता आला असता,किमान तिकडे तरी लोक जमू तरी शकले असते. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला खरा,तत्पुर्वी याबाबत हवा ही केली गेली,परंतु प्रत्यक्षात या मोर्चात माणसांचा सुकाळ दिसून आला नाही. फार-फार मोर्चाकऱ्याच्या बाजूने समाधानकारक बोलायचे झाले, तरी किमान दीडशे लोक ही राज्याच्या नेत्यास आणता आले नाहीत,ही वस्तुस्थिती आहे.

शंकर अण्णा धोंडगे यांच्याकडे धडपड्या नेता म्हणून बघितले जाते. तशी अशी ओळख जिल्ह्याभर आहे.राष्ट्रवादीत असताना किसान मोर्च्याच्या माध्यमातून राज्य पिंजून काढले होते. यावेळी बीआरएस मध्ये अबकी बार किसान सरकार या टॅग लाईनने अण्णा यांना भुरळ घातली व ते सुद्धा बीआरएसमध्ये गेले. राज्यभर फिरून पक्ष वाढविण्यात महत्वाची भूमिका ते बजावत आहेत.पक्षाने वेळोवेळी तात्काळ जेट विमान सेवा उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री सी.चंद्रशेखर राव यांच्याकडे अण्णा यांचे सोन्यासारखे तोलमोलाचे वजन बाळगून आहेत.सदरची बाब स्वागतहार्य आहे.यात काही दुमत असण्याचे कारणही नाही.

अण्णा यांच्या पाठीशी बीआरएस पक्ष किमान राज्या पुरता पोलादसारखा उभा असताना,अण्णा हे जिल्ह्यात माणसांची बांधणी करण्यात कमी पडल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सोडा त्यांच्या मतदारसंघात जिथून ते एकदा निवडून आले होते,त्या लोहा-कंधार मतदारसंघातून हजार-पाचशे लोक त्यांना जमविता आले नाहीत. हे कशाचे धोतक समजावे,एक तर तुमचं राजकीय आस्तिव संपले असावे किंवा पुत्र प्रेमापोटी पक्ष विस्तार करण्यास येणाऱ्या मर्यादा हे दोन कारणे ग्राहय धरली जाऊ शकतात, किंवा आपणास निवडणूक जिकण्यासाठी लढायचीच नाही.असे ही असू शकते. लोहा येथील त्यांचे जावई जिल्हा परिषद माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनी धोंडगे कुटूंबियांपासून राजकीय फारकत घेतल्याचे समजते.

जिल्ह्यांतील एकही नेता अण्णा सोबत नसणे आणि तेच अण्णा राज्याचा नेता म्हणून मिरवून घेत असतील तर याचही आत्मपरिक्षण करण्यास कालच्या प्रचंड मोर्चा पुरेसा आहे. हे सगळं पहाता कलचा धडक मोर्चा सत्ताधारी व नोकरशहा यांच्या हृदयात धडक भरवू शकला नसला,तरी शंकर अण्णा धोंडगे यांच्यासाठी राजकीय धडकी भरविणारा ठरला हे मात्र नक्की म्हणता येईल.