नांदेड,बातमी24 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक कैलाश तुकाराम मोरे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, तसेच पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर, 2020 व 16 मार्च 2020, 26 मार्च, 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असे माळवदकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.