नांदेड, बातमी24ः- गोदावरी पात्रामध्ये हजारो मासे मरून पडल्याने खच साचला आहे. मासे कशामुळे मरण पावले याचे कारण अद्याप महानगर पालिकेच्या अधिकार्यांना समजू शकले नाही. याबाबत विद्यापीठामधील एक्सपर्ट टीम बोलावून माहिती मिळविली जाणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. संजय लहाने यांनी दिली.
मागच्या दोन दिवसांमध्ये मासे गोवर्धन घाट, नगिना घाट, शनिमंदीर घाट या भागातील नदीकाठी मासे मरून पडले, असून या माशांची दुर्गंधी पसरू लागल्याने नदी पात्रामधील पाणी दुषित होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मासे मरण पावल्याची घटना सिद्धनाथ, किक्की,शंखतिर्थ, वासरी व आमदुरा भागात घडली होती. त्याची पुर्नरावृत्ती नांदेड शहरातील घाट परिसरात बघायला मिळाली आहे.
अचानक मासे मरणाचे कारण महापालिकेच्या अधिकार्यांना समजू न शकल्याने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधील रसायन शास्त्र विभागाचे प्रा. अर्जुन भोसले यांना गोदावरी नदी पात्रास भेट देण्यास आमंत्रित करण्यात आले असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. भोसले यांच्याकडून मासे मरणाचे शास्त्रीय कारण समजू शकेल असे अंधारे म्हणाले.
——
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
गोदावरी नदी पात्राची जबाबदारी ही पाटबंधारे विभागाची असते.नदीपात्रात मासे कशामुळे मरण पावले याची माहिती घेण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असताना सुद्धा एकाही अधिकार्याने जाऊन शहानिशा केली नाही. एकाप्रकारे याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.