नांदेड, बातमी24:-पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला,की हिंगोली गेट भुयारी पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते,त्यामुळे वाहतूक पुर्णपणे बंद राहते. या हिंगोली गेट येथील भुयारी पुलाची पाहणी मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने व नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केली. यावेळी पाण्याचा निचरा व्हावा,यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावी,अशी मागणी या भागाचे नगरसेवक बापूराव गजभारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे केली.
मागील अनेक वर्षांपासून हिंगोली गेट भुयारी पूल पावसाळ्यात पाण्याखाली येतो.पाण्याचा निचरा होत नसल्याने या पुलाखाली भरपूर पाणी साचत असते,परिणामी मनपाला पुलाखालची वाहतूक व्यवस्था बंद करावी लागते.पूर्णपणे पाणी निचरा व्हायला दोन ते तीन दिवस लागतात.
रविवारी नांदेड शहरात तुफान वृष्टी झाल्याने पुलाखाली भरपूर पाणी साचले होते. या पुलाची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने व नगरसेवक बापूराव गजभारे आले होते.यावेळी या पुलाच्या पाण्याच्या समस्येबद्दल गजभारे यांनी डॉ.लहाने यांना माहिती दिली. याबाबत तातडीने तोडगा काढला जाईल असे आश्वासन डॉ.लहाने यांनी दिले.