नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे संयमी व सर्वांशी आपुलकी आणि प्रेमाने वागणारे व्यक्तीमत्व आहे. प्रवीण पाटील चिखलीकर यांना राग आल्याचे कधीच दिसून आले नाही. मात्र काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ते एका अधिकार्यावर चांगलेच भडकल्याचे पाहून अधिकारी, पदाधिकारी व समिती सदस्यांच्या भवया उंचावल्या.
जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली.प्रवीण पाटील चिखलीकर हे स्थायी समिती सदस्य आहेत. प्रवीण पाटील चिखलीकर यांनी ग्रामसेवकांच्या अडचणी संदर्भात प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. कोंढेकर यांना दिल्या होत्या. मात्र याकडे श्री. कोंढेकर यांनी दुर्लक्ष करत सूचनेला बगल देण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारावरून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कोंढेकर यांची चांगलीच झाडाझडती घेतली. कधी कामे आम्ही सांगत नाही, प्रशासनास कधीही अडचणीत आणण्याचा उद्देश नसतो. परंतु एखादे काम सांगितल्यास तेही ऐकण्याची तयारी नसेल, तर यापुढे कोंढेकर यांची माझ्याशी गाठ असेल, या शब्दात त्यांनी ठणकावले.
कोंढेकर यांचा समाचार घेत असताना पदाधिकारी व समिती सदस्य गप्प बसून होते. मागच्या सात ते आठ वर्षांच्या काळात प्रवीण पाटील चिखलीकर हे कोणावर ही कधीच भडकल्याचे बघायला मिळाले नाही. मात्र कोंढेकर यांचे कालच्या बैठकीत कपडे उतरविण्याचे काम चिखलीकर यांनी करून आपला कधी नव्हे असा रुद्र आवतार सभागृहाला दाखवून दिला.