जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील दलितवस्ती विकास निधीची 52 कोटी रुपयांची संचिका गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी संबंधित टेबलच्या कर्मचार्यास दोन नोटीसा बजावल्या असल्याचे समजते. इतक्या मोठया रक्कमेची संचिका कशी काय गायब होऊ शकते याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असून या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या पुढार्यांकडे संशयाची सुई वळत आहे.
मागच्या महिन्यात जिल्हा परिषदेच्या वतीने मागच्या वर्षभरापासून अडगळीत पडलेल्या समाजकल्याण विभागातील दलितवस्ती विकास निधीचे 48 कोटी रुपये अखर्चित होते. समाजकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक यांनी पुढाकार घेत निधी वाटप होऊ शकले. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य सौ. पुनम पवार यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका खारीज केली गेली.
दलितवस्ती विकास निधी संदर्भातील आदेश व त्यानंतर न्यायालयीन लढाई यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर समाजकल्याण विभागातून 52 कोटी यांचे आदेश काढलेली संचिकाच गायब झाली आहे. या संचिकेचा आठ दिवस शोधा-शोध घेतल्यानंतर हाती न लागल्यामुळे समाजकल्याण अधिकारी आऊलवार यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीशीला समाधानकार उत्तर न मिळाल्याने बुधवार दि. 24 जून रोजी पुन्हा स्मरण नोटीस देण्यात आली आहे.
——
एखादा विभागातील संचिका गायब होण्याचा प्रकार जिल्हा परिषदेला नवा नसून यापूर्वी अशाच प्रकारच्या वादग्रस्त संचिका शिक्षण विभागातून हातो-हात गायब झाल्याचे प्रकरणे समोर आलेली आहे. तशाच प्रकारे जिल्हा परिषदमधील संचिकेला सुद्धा पाय फु टल्याची बाबसमोर आली आहे. संचिका गेली कुठे आणि कधी सापडणार याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणी कुणाची ही गय केली जाणार नसल्याचा इशारा आऊलवार यांनी दिला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.