शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या संदर्भात प्रशासनाचा संघटनांशी संवाद

नांदेड

नांदेड, बातमी24ः राज्य शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलल्या पारदर्शीपणे करण्यात येतील, अशी ग्वाही जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी शिक्षक संघटना पदाधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीत केली.

यावर्षी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या 31 जुलै पर्यंत करावयाच्या असल्याने याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटना पदाधिकारी यांची विशेष बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी शिक्षण समिती सभापती संजय बेळगे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी डॉ. सुधीर ठोंबरे,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी के.टी.आमदुरकर, मठपती, बळीराम येरपूलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

बदल्या ऑफलाईन असल्या तरी, प्रक्रिया ऑनलाईन प्रमाणेच करावी. सन.2018-19, 2019-20च्या बदल्यात विस्थापित झालेल्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आवश्कता असल्यास फक्त आपशी/विनंती बदल्या कराव्यात. कोव्हीड-19च्या पार्श्वभूमीवर बदल्या 31 जुलै पर्यंत न करता सप्टेंबर पर्यंत कराव्यात. बदली धोरणानुसार संवर्ग 1,2,3ला प्राधान्य आहेच,परंतु संवर्ग चार म्हणजेच (एकल शिक्षकांवर) अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच तालुक्यात सर्व सवंर्गाच्या रिक्त जागा सारख्या ठेवून समानीकरनाने सर्व संवर्गाच्या समतोल बदलल्या कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.