सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोना पॉझिटीव्ह

महाराष्ट्र

नांदेड, बातमी24ः सामान्यांसह नांदेड जिल्हयातील बडया राजकारण्यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता.यात नव्या नावाची भर पडली, असून सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे सर्वात निकटवर्तीय असलेल्या एका आमदारास कोरोनाची लागण झाली आहे. असे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील पडदा आडून सुत्र हालविणारे अशोक चव्हाण यांचे विश्वासू अशी राज्यभर ओळख त्या आमदाराची आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी ते मुंबईवरून आले होते. यानंतर त्या आमदार महोदयांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस सुद्धा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत हजेरी लावली होती.

सोमवारी सकाळी रॅपीड टेस्ट करण्यात आली. यात ते आमदार व त्यांची कन्या या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्या आमदाराने शनिवारच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस हजेरी लावल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण व इतर अधिकार्‍यांनी सुद्धा स्वतःला क्वॉरंटाईन करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण, नांदेड दक्षीणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह उपमहापौर, माजी महापौर व नगरसेवकांना सुद्धा कोरोना झाला आहे. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा कोरोनाशी रुग्णालयात दोन हात करत आहेत.