जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- सरकारसोबत कायम दोन हात करण्याच्या कुरपतीमुळे वादग्रस्त ठरलेले राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या येणार आहेत. यापूर्वीच राज्य सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरबाबत आक्षेप घेतल्याने हा दौरा वादात आला. तसेच राज्यपालांच्या हस्ते होणाऱ्या सोहळ्यास पालकमंत्र्यासह इतर लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.राज्यपाल भवनकडून जी चूक करण्यात आली,त्याच चुकीची रेघ विद्यापीठाने सुद्धा पुढे ओढली आहे.त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांचा दौरा वादविवादित करणारा तर विद्यापीठ प्रशासनाची बौद्धिक दिवाळखोरी करणारा ठरणार आहे.
राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांचे गुरुवार दि.5 रोजी 10 वाजता नांदेड येथे आगमन होणार आहे.ते दिवसभर विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमांना हजेरी लावणार असून त्यांचा मुकामीही नांदेड येथे असणार आहे.भरगच्च कार्यक्रम राज्यपाल यांच्या उपस्थितीत होणारे असले, तरी या कार्यक्रमाचे अधिकृतपणे आमंत्रण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले नाही.त्याचसोबत जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर असो की जिल्ह्यातील आमदार मंडळींनाही आमंत्रण देण्यात आलेले नाही.त्यामुळे राज्यपाल यांच्या दौरा व भरगच्च कार्यक्रम हे लोकप्रतिनिधींना डावलून कसे काय उरकले जाऊ शकतात,याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
राज्यपाल हे एखादा जिल्ह्यात येणार असल्यास किमान महिना ते पंधरा दिवसपूर्वी अवगत केले जाते.मात्र कोशायरी यांचा दौरा अचानक व इतका घाई गडबडीत कसा काय नियोजित झाला आहे.याबद्दल उलट सुलट चर्चा होत आहे. राज्यपाल यांच्या घाई घाईत होणारा दौरा,हा प्रशासनाची सुद्धा धांदल उडविणारा ठरत,असून हया दौऱ्याच्या निमित्ताने विद्यापीठास फारशी तयारी करण्याची संधी मिळाली नाही.विद्यापीठ अधिकाऱ्यांचे नियोजन करताना मोठी घालमेल झाली असून रात्री उशीरापर्यंत नीटनेटकेपणा आणण्यात जाणार आहे.
विशेष म्हणजे विद्यापीठास आमंत्रण पत्रिका काढण्याची संधी राज्यपाल कोशायरी यांच्या जलदगती दौऱ्यामुळे मिळू शकली नाही. राज्यपाल कोशायरी यांचे बालहट्ट पुरविण्यासाठी विद्यापीठास हँजी हँजी करत कार्यक्रम करावे लागत असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर कुणास ही उघडपणे बोलता येत नसून तोंड दाबून बुक्यांचा मार अशी गत विद्यापीठ प्रशासनाची झाली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या दोऱ्याचा केवळ राजशिष्टाचार हा सोपस्कार पाळणे इतकेच विद्यापीठाच्या हाती आहे.
—–
दौऱ्यासंदर्भात माहिती नाही:-मंत्री चव्हाण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याबाबत राज्यपाल भवनकडून कुठली ही कल्पना मिळालेली नाही.सध्या सरकार पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्यात व्यस्त असून त्या संदर्भाने बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे.उद्याही अशाच बैठक मंत्रालयात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.तर
विद्यापीठ कुलगुरू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांनी फोन कॉल घेतला नाही.